शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 3, 2024, 02:31 PM IST
शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत title=
शिंदेंच्या मुलाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंचा उमेदवार

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: उद्धव ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनीच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. उन्मेष पाटील यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीमधून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबरच ठाकरे गटात आलेले त्यांचे निकटवर्तीय करण पवार यांना जळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या यादीमध्ये सध्या महायुतीमध्ये चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघातील ठाकरे गटाचा उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. 

शिंदेंच्या मुलाविरुद्ध लढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार यासंदर्भातील संभ्रम आज संपुष्टात आला जेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वत: या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. वैशाली दरेकर यांचं नाव फारसं चर्चेत नसताना अचानक त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण ठाकरे गटाकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या पुत्राशी निवडणुकीच्या रिंगणात टक्कर घेणाऱ्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण हे पाहूयात...

वैशाली दरेकर कोण?

> वैशाली दरेकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.

> कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. 

> वैशाली दरेकर या 49 वर्षांच्या आहेत. 

> वैशाली दरेकर यांनी 2009 साली कल्याण मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती.

> 2009 साली वैशाली दरेकर यांना 1 लाखांहून अधिक मतं पडली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.

नक्की वाचा >> 'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

> 2010 साली त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि त्या निवडून आल्या.

> 2009 पूर्वी वैशाली दरेकर शिवसेनेमध्ये होत्या. त्यानंतर त्या मनसेत गेल्या. मात्र 2016 मध्ये त्या पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्या.

> एकनाथ शिंदेंसहीत अनेक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही वैशाली दरेकर या ठाकरे गटातच राहिल्या. 

शिंदेंसाठी महत्त्वाचा मतदारसंघ

मुख्यमंत्री एकनाथ शिदेंसाठी कल्याणचा लोकसभा मतदारसंघ फार महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. महायुतीमधील जागावाटपासाठी स्वत: एकनाथ शिंदे हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रही होते. यामागील कारण म्हणजे येथून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे राहणार आहेत. यापूर्वी 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत श्रीकांत शिंदे मोठ्या फरकाने जिंकून आले होते. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी दोन्ही वेळेस अगदी जीवाचं रान केलं होतं. कल्याण आणि डोंबिवलीबरोबच अंबरनाथसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये यंदा महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या मैदानात आहेत. आता मनसेकडून निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेल्या वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना कशी टक्कर देतात हे आगामी काळ आणि 4 जून रोजीच्या मतदान मोजणीनंतरच स्पष्ट होईल.