शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'

Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 23, 2024, 01:26 PM IST
शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...' title=
पत्रकारांच्या प्रश्नाला उमेदवारानेच दिलं उत्तर

Loksabha Election 2024 Shirur Constituency: शिरुर मतदारसंघामधून शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंविरुद्ध कोण लढणार यावर महायुतीने शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संमतीने शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश 26 मार्च रोजी पार पडणार असून या पक्षबदलाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संमती दिली आहे. मात्र यानंतर शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला अशी टीका होत असल्याच्या दाव्यावर स्वत: अढळराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

पक्ष प्रवेश होतोय यावरुन अंदाज बांधता येईल

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. "अजित पवारांच्या निवासस्थानी दिलीपराव वळसे-पाटील, शिवाजीराव अढळराव, अतुल बेनके, नितीन तुपे, दिलीपराव मोहिते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 26 तारखेला शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे," असं सुनील तटकरे म्हणाले. शिरुर आंबेगाव परिसरामध्ये या सोहळ्याचं आयोजन केलं जाईल असंही सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. "महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे होते. आज संध्याकाळी त्यावर शिक्कामोर्तब होणार. दिर्घकाळ लोकसभेत अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीराव अढळराव-पाटील यांना पक्ष प्रवेश आहे यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता," असंही सुनील तटकरे म्हणाले.

उमेदवारी मिळणारच?

अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळणार का यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, 'ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय उमेदवारी निश्चित होईल का हा बाळबोध प्रश्न विचारण्याची गरज नाही.' असं सूचक विधान केलं.

शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? 

"शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला असं म्हटलं जात आहे," असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, "असं कुणाचंही काही म्हणणं नाही. कुणी काही म्हणत नाही तसं. ही महायुती आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. या तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे. त्यामुळे कुणी पळवलं कुणी काय असं काही नाही. याचं सरळ गणित असं आहे की महायुतीचा उमेदवार आहे," असं उत्तर दिलं. "महायुतीमधील सर्व घटकपक्षांना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी 'अब की बार 400' पार धोरणानुसार महाराष्ट्रात मिशन 45 साठी सर्व मतभेद विसरुन एकत्र काम करणार आहोत," असंही शिवाजीराव आढळराव पाटील सांगायला विसरले नाहीत.

नक्की वाचा >> '..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'

इतर उमेदवारांचीही अदलाबदल होणार का?

काही उमेदवार दुसरीकडे जातील का? असा प्रश्न सुनील तटकरेंना विचारण्यात आला. "45+ उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्याचा चंग आम्ही बांधला आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढले. पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये ताकद वाढले. त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं आहे. त्यामुळे नक्कीच आमची ताकद वाढेल," असं सुनील तटकरे म्हणाले.

कोल्हेंचा पराभव निश्चित?

अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा पराभव होईल असं सांगितलं होतं. आता अढळराव यांचा पक्षप्रवेश झाल्याने हा पराभव निश्चित समजावा का? असं विचारला असता सुनील तटकरेंनी, "यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि महायुतीच्या समर्थनाने मोठ्या फरकाने निवडून येईल," असा विश्वास व्यक्त केला. 

नक्की वाचा >> '..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'

3 लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार

"2019 चा बदला घेणार का?" असा प्रश्न विचारला. "त्यासाठीच मी उभा राहणार आहे," असं उत्तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलं. "विजयाची खात्री आहे का?" या प्रश्नावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, "100 टक्के खात्री आहे. मला काय माझ्या जनतेलाही आहे. माझं जे गणित आहे त्यानुसार काहीही पाठबळ नसताना मी आतापर्यंत ज्या निवडणूक जिंकलो आहे ज्यामध्ये पहिली निवडणूक 30 हजार मतांनी जिंकलो. दुसरी 1 लाख 80 हजारांनी जिंकलो तर तिसरी 3 लाख 3 हजारांनी जिंकलो. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल यात शंका नाही," असं म्हटलं.