Bhawana Gawali On Washim Constituency: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगत पाहायला मिळणार आहे. दोन्हीकडे 3 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्याने जागापाटपावेळी वरिष्ठांची त्रेधातिरपीट उडाली. यानंतर काहींना राज्यसभेचे आश्वासन तर दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अशा अनेक गोष्टी कराव्या लागल्या. असाच प्रकार वाशिम-यवतमाळ मतदार संघात पाहायला मिळाला. भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार जनमत नसल्याने भावना गवळींना येथून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले गेले. याबद्दल भावना गवळींना विचारण्यात आलं. यावर त्यांनी केलेल्या विधानामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलंय. काय म्हणाल्या भावना गवळी? जाणून घेऊया.
वाशिम-यवतमाळच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम शहरात शिवसेना सवांद मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नीलम गोऱ्हे, खासदार भावना गवळी, हेमंत पाटील आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माझी उमेदवारी कापवी याची मला खंत आहे. माझी एक झाशी गेली एक किल्ला गेला असेल तरी काही हरकत नाही. इतर किल्ले लढवीन. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा काही वेळा एक पाउल मागे यायचे.
मी ठरलं ते करतेय. येत्या काळात करून दाखवणार आहे. आज मात्र त्याबद्दल आता सांगणार नाही. उमेदवारी का कापली गेली गेली, याबद्दल कार्यकर्ते विचारात होते. त्यावर मी उत्तर दिलं. माझ्या मुख्य नेत्याला याचं उत्तर माहिती नाही तर मी काय सांगू? असं वक्तव्य त्यांनी वाशिम येथील संवाद सभेत केलं. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
भावना गवळी यांचे तिकीट कापताना शिंदे गटावर कोणता दबाव होता का? यावेळी एकनाथ शिंदे यांनादेखील विचारात घेतलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.