'घड्याळ निघून गेल्यानं वेळ काय जुळेना...', अमोल कोल्हेंची लग्नमंडपात कोपरखळी

Amol Kolhe: महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी लग्न मंडपात केलेल्या भाषणाची क्लिप सध्या व्हायरल होतेय.

Pravin Dabholkar | Updated: Mar 31, 2024, 12:04 PM IST
'घड्याळ निघून गेल्यानं वेळ काय जुळेना...', अमोल कोल्हेंची लग्नमंडपात कोपरखळी title=
Amol Kolhe Shirur

Amol Kolhe: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व नेते आपापल्या मतदार संघात जोमाने कामाला लागले आहेत. राजकीय मंचावरुन आव्हान-प्रतिआव्हान, वाद-प्रतिवाद होतंच असतात. पण लग्नमंडपात मिश्लिक कोपरखळी मारण्याची संधीदेखील कोणी सोडत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे एका लग्नाला उपस्थित होते. त्यांनी लग्न मंडपात केलेल्या भाषणाची क्लिप सध्या व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये अमोल कोल्हे काय म्हणाले? कोणाला उद्देशून म्हणाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आमदार दिलीप मोहितेंच्या पुतणीचा विवाह सोहळा शिरुर येथे संपन्न झाला. अमोल कोल्हे यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हेंना यायला थोडा उशीर झाला. जेव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या खास शैलीत बॅटींग करण्याची संधी काही सोडली नाही. कोल्हे शुभाशीर्वाद देत होते. त्यावेळी लग्नाला यायला उशीर झाला, असं एकाने त्यांना विचारलं. हाच धागा धरून कोल्हेनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे यायला विलंब झाला. आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं, हातात घड्याळ असून उशीर का झाला. घड्याळ निघून गेल्यानं, वेळ काय जुळेना झाली. पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी, असं मी म्हटल्याचे कोल्हेंनी सांगितलं. असे बोलताना अमोल कोल्हेंनी कळत नकळत मोहितेंना कोपरखळी लगावली. कोल्हेच्या विधानाला मोहितेंनी स्मितहास्य करत प्रतिसादही दिल्याचे पाहायला मिळाले. 

वधुवरांना आई जगदंबा सर्व सुख देवो. जे जे सुख असेल सगळ देवो. महाराष्ट्रातल्या माता भगिनी लेकींना मातृत्व, नेतृत्व, कर्तुत्वाचा वसा वारसा लाभलेला असतो. मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊंसारखं, कर्तुत्व असतं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व असतं पुण्यश्लोक अहिल्याबाईंसारखं. असा मातृत्व, नेतृत्व कर्तुत्वाचा वसा लाभलेली मोहिते पाटील कुटुंबाची सुकन्या श्रुतिका  शिंदे पाटील कुटुंबाचा भाग होतेय, असे म्हणत त्यांनी दोन्ही परिवाराला शुभेच्छा दिल्या. 

अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे शिरुर मतदार संघातील उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट पडल्याने येथे चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.