'अमरावतीत कोणाची लाट नाही..नेते लाचार...', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपटले दंड

Amaravati Bachhu Kadu: ही निवडणूक नाही तर जन आंदोलन आहे, हे आजच्या रॅलीतून सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. 

Updated: Apr 3, 2024, 11:30 AM IST
'अमरावतीत कोणाची लाट नाही..नेते लाचार...', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपटले दंड title=
Bachhu Kadu On Navneet Rana

अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती: आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल उपस्थित राहणार आहे. त्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून महायुतीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा भाग असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू या निर्णयावर नाराज आहेत. त्यांनी नवनीत राणांविरोधात दंड थोपटले आहेत. नवनीत राणांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अमरावतीमध्ये दिनेश बुब यांची नामांकन यात्रा काढली जाणार आहे. ही निवडणूक नाही तर जन आंदोलन आहे, हे आजच्या रॅलीतून सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. 

मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही

नेते लाचार झालेले आहेत पण आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रहार हे निमित्त आहे. अमरावती लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही. एक नकार मात्र नक्की आहे. सर्वांना नवनीत राणा नकोय. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तो तुम्ही सांगेल. त्यांनी आमचं कार्यालय फोडलं, भाजपच्या कार्यकत्याला रक्त भांबाळ केलं, पालकमंत्र्यांना बालक मंत्री म्हटलं. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही सर्व जाणून आहेत, असेही कडू म्हणाले आहे.

'भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजूनही भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कडू यांनी भाजपवर पुन्हा प्रहार केला आहे. भावना गवळी यांच्या उमेदावरीत गेम फॅक्टर असू शकतो. भाजपने शिंदे साहेबांचा बळी न घेता त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं पाहिजे. भावना गवळी पाच वर्षापासून खासदार आहेत. त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्याव तो त्यांचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया  प्रतिक्रिया कडू यांनी दिली आहे.