Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 2, 2024, 11:42 AM IST
Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत title=
मराठा समाजाने घेतला निर्णय (प्रातिनिधिक फोटो)

Loksabha Election 250+ Candidates Will Fight From This Constituency: मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जरांगेवर झालेला कथित अन्याय आणि त्यांची विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 250 हून अधिक उमेदवार उतरवण्यात येणार आहेत.

थेट मतपेटीतून उत्तर

माजी मुख्यमंत्री आणि मराठा समाजासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले नेते अशोक चव्हाण यांनी काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातून थेट मतपेटीतून उत्तर देण्याचा मराठा समाजाचा मानस आहे.

कशी झाली सरुवात?

अर्धापूरमधील पिंपळगाव (महादेव) या गावातील ग्रामपंचायतीत संमत झालेल्या ठरावातून ही सारी गोष्ट सुरु झाली. या गावातील 10 तरुणांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला. यामधूनच प्रेरणा घेत आता अर्धापूर तालुक्यातून तब्बल 250 हून अधिक मराठा तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरलं आहे. राज्य सरकारविरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्धापूरमध्ये यासंदर्भातीललल प्राथमिक बैठक झाली असून या बैठकीला 100 हून अधिक पदाधिकारी आणि तरुणांची उपस्थिती होती.

...म्हणून नाराजी

मराठा आंदोलनामध्ये इतर कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक टीक अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवरुन करण्यात आली. काँग्रेसमध्ये असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपाला अनेकदा लक्ष्य केलेलं. मात्र मागील महिन्यामध्ये त्यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र मराठा समाजाला चव्हाणांचा हा निर्णय खटकला. म्हणूनच आता अशोक चव्हाण या भागातील जनमत चाचपणी करत आहेत. चव्हाणांचा दबदबा असलोल्या भोकर मतदारसंघातील 3 तालुक्यात जरांगे समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा विरोध चव्हाणांना भारी पडू शकतो.

अद्याप संवाद नाही

मराठा तरुणांच्या या मतपेटीमधून उत्तर देण्याच्या भूमिकेबद्दल कोणत्याही मराठा नेत्याने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. तसेच कोणत्याही मराठा नेत्याने मतपेटीमधून उत्तर देण्याच्या तयारीत असलेल्या या मराठा तरुणांशी अद्याप संवाद साधलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाकडून खरोखरच तब्बल 250 उमेदवार या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात दिसू शकतील. नुकतेच भाजपात दाखल होऊन राज्यसभेवर वर्णी लागलेल्या चव्हाणांचं टेन्शन या बातमीमुळे वाढू शकतं.