भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मेंढे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांच्याशी होणार आहे. नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीने एन के न्हाने यांना उमेदवारी दिली आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदियातून भाजपच्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा १,४९,२५४ मतांनी पराभव केला होता. पण खासदारपदाचा आणि भाजपचा राजीनामा देऊन नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसने नाना पटोले यांना नागपूरमधून तिकीट दिलं आहे.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
नाना पटोले | भाजप | ६,०६,१२९ |
प्रफुल्ल पटेल | राष्ट्रवादी काँग्रेस | ४,५६,८७५ |
संजय नासरे | बसपा | ५०,९५८ |
धनू वलथारे | अपक्ष | १०,१३३ |
मोरेश्वर मेश्राम | अपक्ष | १०,१२७ |