'त्याने भावांना, वडिलांनाही...', संजय राऊत मोदींना औरंगजेब म्हणाल्याने एकनाथ शिंदे संतापले 'याचा सूड...'

Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 21, 2024, 06:40 PM IST
'त्याने भावांना, वडिलांनाही...', संजय राऊत मोदींना औरंगजेब म्हणाल्याने एकनाथ शिंदे संतापले 'याचा सूड...' title=

Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत मोदींच्या अमपानाचा सूड घेईल असा विश्वासही व्यक्त केली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने त्यांनी संताप केला. "हे दुर्देव आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असणाऱ्या मोदींनी देशाला नवा आयाम, उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं, जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशाचा अपमान, देशद्रोह आहे. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण त्यांनी औरंगजेबी वृत्ती त्यांनी दाखवली आहे. औरंगजेबाने भावांना, वडिलांनाही सोडलं नव्हतं. पण यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत सूड घेईल", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

संजय राऊत काय म्हणाले आहेत?

"या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शाह असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असंही ते म्हणाले आहेत. 

उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर

अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शेपूट घातली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात 370 कलम हटवलं. त्यांनी स्वप्न खरं करुन दाखवलं. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही. हे फोटोग्राफर असून त्यांना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाऊन लोटांगण घालणारे, नोटीस आल्यावर शेपूट घालणारे आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी यांनी सगळं सोडलं होतं".