अकोला : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने देशात आणि राज्यात शानदार कामगिरी केली आहे. अकोल्यातून भाजपच्या संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात तिरंगी लढत झाली. अकोल्यात भाजपने संजय धोत्रे यांना आणि काँग्रेसने हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली. तसंच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही अकोल्यातून रिंगणात उतरले.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये अकोल्यातून भाजपच्या संजय धोत्रे यांनी काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचा २,०३,११६ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
संजय धोत्रे | भाजप | ४,५६,४७२ |
हिदायत पटेल | काँग्रेस | २,५३,३५६ |
प्रकाश आंबेडर | भारिप बहुुजन महासंघ | २,३८,७७६ |
अजय हिंगणकर | आप | ८,०७६ |
भाई कांबळे | बसपा | ७,८५८ |
२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.