'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार

Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 8, 2024, 05:06 PM IST
'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार title=
Narayan Rane On Ramdas Kadam

Narayan Rane On Ramdas Kadam: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असे म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय. 
 
आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. 

जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, असा टोला राणेंनी कदमांना लगावला. यामुळे कोकणात शिंदे गट विरुद्ध भाजप असा वाद पेटण्यावर आता शिक्कामोर्तब झालंय.

काय म्हणाले होते रामदास कदम?

सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहेत, असे रामदास कदमांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर कदमांनी भाजपवर निशाणा साधला. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो, पण पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असे विधान रामदास कदम यांनी केले होते. लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण महाराष्ट्रात आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी  मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

युती असताना आम्ही भाजपसोत जाण्याचा इतका मोठा निर्णय घेतला. विश्वासानं भाजपासोबत आलो आणि मंत्रिमंडळ बनलं. असे असताना स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भाजपचे काही नेते भूमिपुजन आणि उद्घाटन करत आहेत. हेच मुळात त्रास देत आहेत, असे रामदास कदमांनी म्हटले होते. हे असं होत असेल तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरी, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपचं घृणास्पद राजकारण सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली. 

फडणवीसांचा पलटवार 

रामदास कदमांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. 'रामदासभाईंना मी अनेक वर्ष ओळखतो. टोकाचे बोलण्याची त्यांना सवय आहे. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केलाय, असे ते म्हणाले. आम्ही 115 आहोत, तरीदेखील शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केले. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचे आम्हाला समाधान आहे', असे उत्तर फडणवीसांनी कदमांना दिले होते.