जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही दिवस आधी भाजपावर उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. जळगाव मतदारसंघात भाजपाकडून आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपातील पक्षांतर्गत विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.
यावर प्रतिक्रिया देताना, शालेय तसंच महाविदयलयीन जीवनापासून रक्ताचं पाणी करत ज्या पक्षासाठी काम केलं. त्याच पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतरही जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत... हा महिला कार्यकर्त्यांचा अपमान असून मोठा जनप्रक्षोभक असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार स्मिता वाघ यांनी दिलीय.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाने स्मिता वाघ यांची जाहीर केली होती. त्यांनी एबी फॉर्मसहित उमेदवारी अर्जदेखील भरला होता. मात्र, पक्षाने चाळीसगावचे भाजपा आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिलेत. यामुळं स्मिता वाघ यांचा पत्ता कापला जात असल्याचं दिसतंय.
३० वर्षे आपण पक्षासाठी काम केलं. मात्र चार वर्षांपासून भाजपात आलेल्या आमदाराला पक्षाने कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले? त्याचबरोबर आपलं तिकीट का कापलं जातंय? याचा जाब वरिष्ठ नेत्यांना विचारणार असल्याचं स्मिता वाघ यांनी म्हटलंय.
दरम्यान, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पक्षाचे काम करत राहणार असेही स्मिता वाघ यावेळी स्पष्ट केलं.