प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : धुळ्यातील महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. 'हिंदू राष्ट्र बनाना है, असं लिहिलेलं वाचतो तेव्हा माझ्या मनाला वेदना होतात' असं वक्तव्य त्यांनी केलंय. दरम्यान सोमवारीच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कुणाल पाटील यांचा हा धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
'हिंदू राष्ट्र बनाना है वाचून मनाला वेदना होतात' या विधानामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील वादात अडकलेत. धुळ्यातले काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांनी मालेगाव शहरातल्या प्रचारसभेत केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अशा वक्तव्याद्वारे कुणाल पाटील धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप भाजपा नेते प्रा. अरविंद जाधव यांनी केलाय.
अशा पद्धतीने धार्मिक मुद्द्यांवर मतांचं ध्रुवीकरण करणं उमेदवार आणि नेत्यांनी टाळण्याची गरज, जाणकार व्यक्त करत आहेत.