नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरीला स्थानिकांचा विरोध

जिल्हा प्रशासनाच्या भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे.

Updated: Nov 20, 2017, 04:12 PM IST
नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरीला स्थानिकांचा विरोध title=

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे येणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. देखील जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पासाठी लागणा-या जमीन संपादनाचं काम सुरू केलं आहे. त्याचा पहिला भाग म्हणून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पच नको- स्थानिक

मात्र स्थानिकांनी या मोजणीलाच विरोध दर्शवलाय कोणत्याही परिस्थितीत आम्हाला प्रकल्पच नको, अशी ठाम भूमिकाच इथल्या स्थानिकांनी घेतली आहे. राजापूर तालुक्यातील डोंगर गावातील दत्तवाडी, नाणार गाव, पाळेकरवाडी आणि सागवे गावातील कात्रादेवी वाडी या ठिकाणीची जमीन मोजण्याचं काम केलं जाणार आहे, तसेच यापूर्वी देखील जिल्हा प्रशासनाने काही ठिकाणी सुनावणी घेतली खरी मात्र या सुनावणीला स्थानिकांनी विरोधच दर्शवला.

स्थानिकांचा विरोध कायमच

प्रकल्पच नको अशी ठाम भूमिकाच या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. आपली वडिलोपार्जीत शेतीवाडी सोडून इथले गावकरी जाण्यास तयार नाहीत त्यामुळे ह्या प्रकल्पाला इथल्या स्थानिकांचा विरोध कायमच राहणार आहे.

पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प

केंद्र शासनातर्फे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरीत्या सुमारे साठ दशलक्ष टन प्रती हंगाम क्षमतेचा आणि दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. 

१५ हजार एकर क्षेत्रात प्रकल्प

राजापूर येथील नाणार येथे १४ हजार एकर क्षेत्रात प्रकल्पाचा एक भाग आणि दुसरा भाग विजयदुर्ग परिसरात १ हजार एकर क्षेत्रात असेल मात्र या सगळ्याच गावातून या प्रकल्पाला विरोध दर्शवला जातोय.