Maharashtra Breaking News LIVE Updates:मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशानातील तिसऱ्या दिवसाच्या घडामोडींबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates:मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

18 Dec 2024, 10:07 वाजता

अजित पवार घेणार भुजबळांची भेट; नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु

ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

18 Dec 2024, 09:26 वाजता

विधानसभा अध्यक्षपदानंतर भाजपाच्या हाती लागणार आणखी एक मोठं पद?

विधानसभेनंतर विधान परिषदेचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा महायुतीतर्फे राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 10 वाजता राम शिंदे अर्ज भरणार आहेत. विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीकडे 35 जागांचं बळ असून महाविकास आघाडीकडे केवळ 17 जागा असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात आहे. 

18 Dec 2024, 08:40 वाजता

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात होणार सहभागी 

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

18 Dec 2024, 08:35 वाजता

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वडगाव मावळच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचे शरीर हे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

18 Dec 2024, 08:33 वाजता

भीमा-कोरेगाव प्रकरणात आज सुनावणी; प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी

भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला प्रकाश आंबेडकर हजर राहणार आहेत. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्या आहेत. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार असून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

18 Dec 2024, 08:31 वाजता

हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंबरोबरच शशिकांत शिंदेंनी घेतली अजित पवारांची भेट

मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अदिती तटकरे, शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून पहिल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार कामकाजात सहभागी झाले नाहीत. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या विजयगढ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

18 Dec 2024, 08:07 वाजता

मंत्री हसन मुश्रीफ अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'विजयगड' निवासस्थानी दाखल

नागपूरमधील घडामोडींना वेग आल्याचं चित्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळत आहे. आज सकाळी अजित पवारांच्या नागपूर येथील 'विजयगड' या निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे.

18 Dec 2024, 07:59 वाजता

अजित पवार आज तरी सभागृहात येणार का?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाच्याही गाठीभेटी घेतल्या नाहीत, शिवाय ते सभागृहात देखील अनुपस्थित होते. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तरी अजित पवार सभागृहात येतील का? याकडे लक्ष लागलेल आहे. 

18 Dec 2024, 07:43 वाजता

जालना : जरांगेंचा सातव्यांदा आमरण उपोषणाचा इशारा; 25 जानेवारीपासून...

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा सामूहिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येणाऱ्या 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. या उपोषणादरम्यान महाराष्ट्रातील मराठ्यांनी इतर कुठेही उपोषण न करता याच उपोषणात येऊन सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. ज्यांना उपोषणात बसायचं नाही त्यांनी या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी अंतरवालीत यावं असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

18 Dec 2024, 07:41 वाजता

पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात पोलिसांकडूनच जादूटोणाविरोधी फिर्याद

पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात सरकार तर्फे पोलिसांनी 'महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013' नुसार गुन्हा दाखल केला आहे. धुळे पोलिसांनी पुढाकार घेत अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील तिघांना धुळे जिल्ह्यातील सांगावी परिसरात पैशाचा पाऊस पाडल्याच अमिष दाखवण्यात आलं होतं. या ठिकाणी या तिघांची लूट करण्यात आली होती. त्यांना मारहाणी करण्यात आले होती. या घटनेमध्ये गोळीबार ही झाला होता. त्यानंतर जखमी मांत्रिकावरती धुळे येथे उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गुन्ह्यासोबत जादूटोणा अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखला केला आहे. पोलीस स्वतःच या गुन्हामध्ये फिर्यादी झालेले आहेत.