एसटी बंद, मग काय? घोडेस्वारी करत 'ती' निघली शाळेत...

 घरा पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली

Updated: Dec 11, 2021, 08:53 PM IST
  एसटी बंद, मग काय? घोडेस्वारी करत 'ती' निघली शाळेत... title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : राज्यातील ग्रामीण भागातून गावातल्या तसेच शहरांमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा मोठा आधार आहे.. मात्र मागच्या महिनाभरापासून एसटी पूर्णपणे बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

असं असलं तरी बीडच्या एका शाळकरी मुलीने एसटी बंद असल्यानं आपली शाळा थांबू नये यासाठी चक्क घोड्यावर स्वार होऊन ती रोज शाळेत जात आहे.

उजनीच्या सिद्धेश्वर विद्यालयातील सातवीच्या वर्गात शिकणारी माधवी कांगणे असं या मुलीचं नाव आहे.

माधवी अंबाजोगाईच्या कांगणेवाडीत राहते. कोरोनानंतर शाळा सुरू झाल्या खऱ्या मात्र एसटीचा संप असल्याने शाळेत जायचं कसं असा प्रश्न माधवीला पडला होता, मात्र माधवीने चक्क आपल्या राधा नावाच्या घोडीला खोगीर घातलं आणि घरा पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली उजनी येथील आपली शाळा गाठली.

माधवी घोडेस्वारी वडिलांकडून शिकली आता शाळेत जाण्यासाठी ती रोज घोड्यावर बसून जाते. रोज माधवी घोडीवरून शाळेत येत असल्यामुळे पंचक्रोशीमध्ये सध्या तिची चर्चा सुरू आहे