वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : शहरातल्या विविध कॉफी शॉपमध्ये (Coffee Shop) सध्या कॉलेज विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याला कारण आहे कॉफी शॉपमध्ये मिळणारा एकांत. काही कॉफी शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील चाळे होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. यासाठी अल्पवयीन मुलांकडून (Minor) तासाला केवळ 200 ते 500 रुपये घेतले जातात. लातूर पोलिसांनी (Latur Police) आता यावर कारवाई सुरु केली असून कॉफी शॉपसाठी नियमावली (Regulations) प्रसिद्ध केली आहे.
गैरकृत्याला चालना
लातूर मराठवाड्यातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळकलं जातं. अभ्यासाचा लातूर पॅटर्न (Latur Pattern) राज्यभर प्रसिद्ध असून शैक्षणिक हब म्हणूनही या शहराची ओळख आहे. राज्यभरातून अकरावी बारावी साठी वर्षाला 25 ते 30 हजार विद्यार्थी लातूरमध्ये येत असतात. उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या ही खूप मोठी आहे. यातूनच मित्र-मैत्रिणी आणि प्रेमप्रकरण रंगू लागतात. गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी बसल्यावर पोलिसांच्या कारवाईची भीती असते. तर काही प्रेमी जोडपी शहरातील लॉजचा आधार घेतात. पण इथंही कारवाईची शक्यता असते.
अशा प्रेमी जोडप्यांना शहरातील कॉफी शॉपचा आधार मिळालाय. दोनशे ते पाचशे रुपये देऊन कॉफ शॉपमध्ये एकांतात बसण्याची संधी या जोडप्यांना मिळते.
प्रेमीयुगलांना एकांत मिळावा यासाठी काही कॉफी शॉप विशिष्ट रचना केली आहे. मंद प्रकाश आणि संगीताची सुविधा पुरवण्याबरोबरच त्याठिकाणी कोणी येणार नाही याची पुर्ण दक्षता घेतली जाते. कॉफी आणि नाष्ट्याचे पैसे ते वेगळे घेतात. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे केले जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी लातूरकरांनी पोलीस स्थानकात अनेक तक्रारी केल्या आहेत. पण पोलिसांनी कारवाई करूनही त्याचा कोणताही परिणाम या कॉफी शॉप चालकावर होत नव्हता.
याबाबतच्या मोठ्या प्रमाणातील तक्रारी लातूरचे जिल्हा अधिकारी पृथ्वीराज बीपी आणि लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पर्यंत पोहोचल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कठोर यमावली तयार केली असून यामुळे लातूरमधील कॉफी शॉप चालकांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे नियमावली ..
१) कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही
२) स्वतंत्र कंपार्टमेंट करता येणार नाहीत
३) धूम्रपणास बंदी आहे
४) कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असतील
५) सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आवश्यक आहे...
प्रशासनाने लातूर शहरातील सर्व कॉफी शॉपसाठी ही नवीन नियमावली जारी केली आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार आहे.. प्रशासनाचा या निर्णयाचे लातूरकरांनी स्वागत केलं आहे