प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडच्या (Raigad Landslide) इरसावाडीत (irshalwadi) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 59 लोक बेपत्ता आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पाहता राज्याच्या अनेक भागात दरडप्रवण क्षेत्रांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आम्ही मेल्यावर आमचे पुनर्वसन करणार का? असा उद्विग्न सवाल महाडच्या (Mahad) मोहोत ग्रामस्थांनी सरकारला विचारला आहे. या गावावर दरडीची टांगती तलवार असल्याने गावकरी जीव मुठीत घेऊन राहत आहे. इरसालवाडी दुर्घटनेनं त्यांच्याही मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
महाड तालुक्यातील मोहोत सुतार वाडी आणि भिसे वाडीतील ग्रामस्थांवर दरडीची टांगती तलवार आहे. दोन्ही वाड्यांवर प्रत्येकी 15 ते 20 कुटुंबे राहतात. दोन वर्षांपूर्वी या वाडीवर दरड कोसळली होती. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नव्हती. मात्र आता पुन्हा दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. वाडीत असलेल्या घराच्या खालूनच पाण्याचे झरे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली राहत आहेत. सरकारने या वाड्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले दिलं होतं. यासाठी सर्व्हेक्षण देखील करण्यात आले होते. मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाहीत. त्यामुळे आम्ही मेल्यावर आमचं पुनर्वसन करणार का असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत.
'मरण्याआधी घरे बांधून द्या'
"दोन वर्षांपूर्वी दोन्ही बाजूंनी दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये आमचे नुकसान झालं होतं. त्यानंतर आम्हाला तिथून स्थलांतरीत करण्यात आलं. गेल्या दोन चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आमच्या इथेही तळिये गावासारखी दुर्घटना घडली तर मेल्यानंतर आम्हाला घरं बांधून देणार आहात का? आम्हाला त्याआधीच आम्हाला घरे बांधून द्या. जागा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी सर्वेक्षण देखील झाले आहे. पण आम्ही पाठपुरावा केला तर ते तुमचं पुनर्वसन करु असे म्हणतात. पण ते आम्ही मेल्यानंतर करणार आहात का?" असा सवाल ग्रामस्थाने केला आहे.
"2021 रोजीही अशीच घटना घडली होती. आताही घरांना झरे फुटले आहेत. राहायला आम्हाला जागा नाही. आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहत आहोत.जागा दिली आहे पण शासनानं आम्हाला घरे बांधून द्यावीत," अशी मागणी गावातील महिलेनं केली आहे.
"पहिल्या दिवशी पाऊस आल्यानंतर काही वाटलं नाही. पण त्यानंतर घराखालून झरे फुटल्यानंतर आमची पळापळ सुरु झाली. अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली आहे. आम्हाला घरे हवी आहेत. नाहीतर तळिये सारखी घटना होईल. सरकारनं सांगितलं तळिये सारखं मातीत गाडून जा तर तसेच करु," असेही गावकऱ्याने म्हटलं.