कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका

कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Dec 23, 2019, 01:28 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका title=
संग्रहित छाया

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, नाताळ निमित्ताने गोव्यात जाणाऱ्या आणि ३१ डिसेंबरला कोकणात तसेच गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. कोकण रेल्वेवर २७ डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे जवळपास १० गाड्यांना थांबविण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या आडवली स्थानकावर लूप लाइनचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजे २७ डिसेंबर मध्यरात्री पावणेबारा वाजल्यापासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. यादरम्यान धावणाऱ्या दहा गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि नाताळच्या सुट्टीसाठी पर्टनाला येणाऱ्या पर्यटकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाताळच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र या मेगाब्लॅकमुळे काही रेल्वे गाड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गाड्या आठ तासांच्या वेळेत थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस, गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस, कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर, कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या दहा गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.