Kolhapur Travel : दोन ते तीन दिवसांची सुट्टी आली, की नेमकं भटकंतीसाठी कुठे जायचं? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. हा प्रश्न पडला की धडपड सुरु होते त्याचं उत्तर शोधायची आणि मग अनेक मंडळी डोक्याला ताण देत एखादं नवं ठिकाण शोधण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतात. याच प्रयत्नांसाठी आता नेहमीचं लोणावळा, अलिबाग आणि पुणे या ठिकाणांपेक्षा यावेळी एका नव्या ठिकाणाविषयी जाणून घेऊया. हे ठिकाण काहीसं ऑफबिट असून, इथं एकदा आलात तर तुम्ही तिथून माघारी निघूनही तुमचं मन मात्र तिथंच हरवून जाईल.
हे ठिकाण म्हणजे कोल्हापूरकरांचं कास अर्थात मसाई पठार. मान्सूननं मुक्काम आवरता घेतल्यानंतर दरवर्षी सातारा जिल्ह्यातील कास पठारावर बहुविध प्रजातींची फुलं फुलण्यास सुरुवात होते. रंगीबेरंगी बहर येतो आणि निसर्गाचं सर्वात सुरेख रुप पाहायला मिळलं. साताऱ्याच्या या कास पठारावरील बहराप्रमाणेच कोल्हापुरातही एक असं ठिकाण आहे, जिथं येणारा बहर तुमच्या मनावर भुरळ पाडेल.
ही चर्चा सुरुय कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या मसाई पठाराविषयी. मसाई आणि इदरगंज पठारावर दरवर्षी 'फुलोत्सव' सुरू असतो. यंदाही जिल्ह्यातील मसाई पठार रंगबेरंगी फुलांनी बहरलं आहे. त्यामुळेच दरवर्षी सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस या पठाराकडे निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. त्यामुळं साताऱ्यात कास असलं तरीही कोल्हापुरकरांसाठी मसाईच खास आहे असं म्हणयला हरकत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या शेजारी असणारं मसाई पठार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं. निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण, अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्याची दुलई यामुळे पर्यटकांना हवी तशी आनंदपर्वणी आणि नेत्रसुख इथं अनुभवता येतं. सध्या मसाई पठारवर ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलीमा यांसारखी असंख्य प्रकारची फुलं फुलली आहेत. तसंच दुर्मिळ औषधी वनस्पतीसुद्धा इथं पाहायला मिळत आहेत, मग तुम्ही कधी भेट देताय या ऑफबिट ठिकाणाला?