धक्कादायक! त्याने तंबाखूसाठी मागितला चुना, पण आरोपीने काढला सूरा

तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन कोल्हापूरमध्ये एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना

Updated: Mar 12, 2022, 05:58 PM IST
धक्कादायक! त्याने तंबाखूसाठी मागितला चुना, पण आरोपीने काढला सूरा title=

कोल्हापूर : कोणत्या कारणावरुन वाद होईल आणि ते कोणत्या टोकला जाईल याचा काही नेम असतो. कोल्हापूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आला आहे. 

हॉटेल मध्ये जेवल्यानंतर तंबाखू खाण्यासाठी चुना मागितल्याच्या कारणावरून अनिल बारड या व्यक्तीची हत्या करण्यात आली. हि घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभारवाडी फाटा इथं घडली आहे. चुना देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं पर्यावसान खूनात झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे . मारेकरी विकास नाथाजी कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी रात्री बुरंबाळी इथल्या निसर्ग हॉटेलमध्ये मृत अनिल बारड यांचा भाचा जितेंद्र केरबा खामकर आणि आरोपी विकास नाथाजी कुंभार यांचा तंबाखूला चुना देण्या-घेण्यावरून वाद झाला. 

आरोपी विकास कुंभार याने जितेंद्र खामकर याला शिवीगाळ करून मारहाण केली. भाच्याला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी अनिल बारड गेले असता आरोपी विकासने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात अनिल बारड यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.