प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अनैतिक संबंधात (Extramarital Affair) अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खून केल्या प्रकरणी पत्नीसह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली आहे. 12 जानेवारी 2011 मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील खटल्याचा आज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात (Kolhapur District and Sessions Courts) निकाल लागला. जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी या गुन्ह्यातील 11 आरोपींना दोषी ठरवत त्यातील 8 जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी रवी रमेश माने, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दत्ता माने, आकाश उर्फ अक्षय सिताराम वाघमारे, दिलीप वेंकटेश दुधाळे, अमित चंद्रसेन शिंदे (मयत), लीना नितीन पडवळे, गीतांजली विरुपाक्ष मेनशी, सतीश भिमसिंग वडर (फरारी), इंद्रजीत उर्फ चिल्या रमेश बनसोडे (फरारी) आणि मनेश साहेबांना कुचीकोरवी अशी आरोपींची नावं आहेत.
पतीच्या हत्येसाठी दीड लाख रुपयांची सुपारी
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खुनाची सुपारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिली होती. या प्रकरणात आरोपी लीना पडवळे हि गुन्ह्यातील मृत नितीन बाबासाहेब पडवळे (वय 35, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांची दुसरी पत्नी आहे. लीना नितीन पडवळे आणि रवी रमेश माने या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यावरून लीना हिने रमेश यास अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने नवरा मारहाण करतो. त्याला संपवून टाकूया, असं सांगितलं. दोघांनी यासाठी कट रचला आणि अमित चंद्रसेन शिंदे याला खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली.
त्यानंतर सर्व संशयित आरोपींनी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन कट रचला. त्यानुसार नितीन पडवळे याला 12 जानेवारी 2011 रोजी आर के नगर इथल्या खडीचा गणपती इथं बोलावून घेतले. तेव्हा अमित शिंदे याने लाकडाने डोक्यात वार करून नितीन याला जखमी केले तसंच सोन्याची चेन काढून घेतली. जखमी नितीन यास रात्री शाहूवाडी तालुक्यातील नागझरी या दुर्गम भागात नेण्यात आलं. तिथे शिंदे याने चॉपरने नितीनचे शीर धडा वेगळे केलं. याची सर्व छायाचित्रे त्यांनी रवी आणि मीना यांना पाठवली. त्यानंतर खुनासाठी वापरलेले सर्व साहित्य वारणा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट केला.
21 साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणात सरकारी अभिवक्ता समीउल्ला महंमदइसक पाटील यांनी 21 साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपास अधिकारी डी एस घोगरे, पोलीस पैरवी अधिकारी फारूक पिरजादे यांची सुनावणी वेळी महत्त्वाची मदत झाली.