गोव्याहून मुंबईला येणारी बस उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला जाण्यारा एका बसचा कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आकाश नेटके | Updated: Nov 23, 2023, 12:40 PM IST
गोव्याहून मुंबईला येणारी बस उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू title=

Kolhapur Accident : कोल्हापुरतून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजयानंद ट्रॅव्हल्सची बस गोव्याहून मुंबईकडे निघाली असताना रात्री 2 वाजता हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. पोलिसांकडून अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

कोल्हापुरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी विजयानंद ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असल्याने बस उलटली. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नीलू गौतम (वय 43), रिद्धिमा गौतम (वय 17) आणि  सार्थक गौतम (वय 13) यांचा समावेश आहे. तर इतर चौघेजण जखमी झाले आहे. तर बसमध्ये 25 प्रवाशी असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयानंद ट्रॅव्हल्स ही बस गोव्यावरुन मुंबईत येत होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही बस गोव्यावरुन निघाली होती. माज्ञ कोल्हापुरात मध्यरात्री दोन वाजता बसचा अपघात झाला. कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला येथे भरधाव वेगात असलेली बस अचानक उलटली. या बसमध्ये एकूण 25 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये पुण्याची गौतम कुटुंबिय देखील होते. मात्र बस उलटल्याने गौतम कुटुंबियातील नीलू, रिद्धिमा आणि सार्थक हे बसखाली आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर मनपाचे अग्निशमन दल आणि करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. तर जखमींना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.