कोल्हापुरच्या 'त्या' भीषण अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर...

कोल्हापूरात पंचगंगेच्या पुलावरुन तेरा बळी गेल्यावर यंत्रणा जागी झालीय. गेली अनेक वर्षं नवा पूल रखडलाय... जुन्या पुलाची दुरुस्ती नाही, दिवे नाहीत... पण या सगळ्याकडे लक्ष जाण्यासाठी १३ बळी जावे लागतात, हे दुर्दैव...

Updated: Jan 30, 2018, 11:52 AM IST
कोल्हापुरच्या 'त्या' भीषण अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर...  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगेच्या पुलावरुन तेरा बळी गेल्यावर यंत्रणा जागी झालीय. गेली अनेक वर्षं नवा पूल रखडलाय... जुन्या पुलाची दुरुस्ती नाही, दिवे नाहीत... पण या सगळ्याकडे लक्ष जाण्यासाठी १३ बळी जावे लागतात, हे दुर्दैव...

नवा पूल रखडलेलाच

सरकारी यंत्रणेला गांभीर्यच नाही, हे या अपघाताच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पंचगंगेवरच्या ज्या पूलावर हा अपघात झाला, तो पूल १४१ वर्षं जुना आहे.... दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सहा वर्षांपूर्वी पर्यायी पूल केंद्राकडून मंजूर करून आणला, पणे गेली तीन वर्षं हा नवा पूल अर्धवट स्थितीत बांधलाय. त्यामुळे आयुष्यमान संपलेल्या पुलावरुनच अजूनही वाहतूक सुरू आहे. त्यासाठी एकमेकांवर ढकलपंची करणारी सरकारी उत्तरंही तयार आहेत.

रस्त्यावरचे दिवे १० वर्षांपासून बंदच...

मुळात हा पूल बांधण्याआधीच पुरातत्व खात्याची परवानगी घेणं गरजेचं होतं. पण सार्वजनिक बांधकाम विभागानं ८० टक्के पूल बांधून पूर्ण केला आणि मग पुरातत्व खात्याकडे बोट दाखवून पूल अपूर्ण ठेवला... त्यातच या पुलावर बसवलेले दिवेही गेल्या दहा वर्षांपासून बंद आहेत. अपघातात तेरा बळी गेल्यावर महापालिकेनं हे दिवे सुरू करुन घेतले.

...तर निरपराध जीव वाचले असते!

या अपघातात ड्रायव्हरची प्रथमदर्शनी चूक असल्याचं दिसतंय. पण नवा पूल वाहतूकीसाठी सुरू झाला असता, रस्त्यावर दिवे असते तर कदाचित या तेरा जणांचे प्राण वाचू शकले असते. पण ढिम्म सरकारी व्यवस्थेला जोपर्यंत जाग येत नाही, तोपर्यंत हा बळींचा आकडा वाढतच जाणार आहे.