प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोरगरीब शेतकरी का भरडला जातो आणि काही ठराविक लोक का जास्त मोबदला घेऊन गब्बर कसे होतात? याचा शोध आम्ही घेतला. समृद्धी महामार्ग असो किंवा दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्प... अशा प्रकल्पांमध्ये सामील होऊन दलाल शेतकऱ्यांना लुटतात.
भूसंपादनात कायदेशीर मार्गाने लूट कशी करायची? याचं धक्कादायक वास्तव धुळे जिल्ह्यात समोर आलंय. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राहणारा देसले नावाचा एजंट अधिकाऱ्यांच्या संगनमताने ज्या भागातून नियोजित प्रकल्प जाणार अशा जागांची माहिती मिळवतो.
या माहितीच्या आधारे तो काही जमीन विकत घेतो आणि जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष देतो. मग कायद्याचे उल्लंघन न करता त्या जमिनीवर अथवा शेतीवर फळझाडांची लागवड करायची. पंचनाम्यात या झाडांची नोंद व्यवस्थित होईल याची अर्थपूर्ण दक्षता घ्यायची आणि अवाच्या सव्वा रक्कम आपल्या पदरात पडून घ्यायची. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला मोबदल्याचा चेक मिळणार त्यावेळेस सोबत राहून तात्काळ त्या शेतकऱ्याला बँकेत नेऊन जवळपास निम्मी रक्कम आपल्या घश्यात गिळंकृत करायची पद्धत धुळ्यात आहे.
या पद्धतीत सर्व काही कागदोपत्री प्रक्रिया करुन कोट्यवधींचा मोबदला लुटता येतो. ही पद्धत नवी नसली तरी धुळ्यात यांतही गोलमाल आहे. जो एजंट आहे त्यांची येथे नर्सरी उघडलीय. त्या ठिकाणी भूसंपादनाच्या मोबदल्याच्या निकषात बसतील अशी फळझाड वाढवण्यात येतात आणि तीच रोप शेतात ऐनवेळी लावून पंचनाम्यात दाखवली जातात.
कायद्याच्या चौकटीत राहून देसले करीत असलेल्या उद्योगाबाबत आम्ही खोलात चौकशी केली. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एक मात्र निश्चित या भूखंडाचं श्रीखंड सगळ्यांना मिळत असल्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे धर्मा पाटलांना न्याय देण्यासोबतच झारीतल्या शुक्राचाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर लुटीचा धुळे पॅटर्न वेळीच नष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त होतेय.