कोल्हापूर : कोल्हापुरातील बचावकार्य संपवून नौदलाचे आणि एनडीआरएफचे जवान आज शिरोळकडे रवाना झाले.. दरम्यान कोल्हापुरातील महिलांनी या जवानांना अनोख्या पद्धतीनं निरोप दिला.. रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे या जवानांना कोल्हापुरातील महिलांनी राखी बांधून निरोप दिला.. यावेळी नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांना आपले अश्रू अनावर झाले..
कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांपैकी आतापर्यंत राज्यातील ४ लाख २४ हजार ३३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलंय. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत.
याशिवाय विशाखापट्टणमच्या १५ नौदलाचे पथक बोटींसह कोल्हापुरातील शिरोळकडे रवाना होत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलीय. नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७ तर सांगली जिल्ह्यात ११७ तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४३ हजार ९२२ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.