शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; "प्रामाणिकपणे कर्ज..."

सरकारने आश्वासन दिलंय पण त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल देखील या शेतकऱ्याने केला आहे

Updated: Jul 23, 2022, 02:47 PM IST
शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; "प्रामाणिकपणे कर्ज..." title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :   राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. 

पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांनी (Farmer Loan) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी केली होती. त्यानुसार, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

जाचक अटी  रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र अद्याप अनुदान न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने चक्क स्वतःच्या रक्ताने आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्याना आपल्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. शिरोळ तालुक्यातील विश्वास बालीघाटे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.

सरकारने आश्वासन दिलंय पण त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल देखील या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. जर सरकारने तात्काळ अनुदानाचे 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत तर बेमुदत प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा देखील या पत्रातून देण्यात आला आहे.