कोरोनाचे संकट । पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे लिफ्टच्या बहाण्याने वाटेत अपहरण

कोरोनाचे संकट असल्याने आणि हाताला काम नसल्याने पायी गावी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन मुलीचे अपहरण केल्याची गंभीर घटना घडली आहे.

Updated: May 20, 2020, 02:25 PM IST
कोरोनाचे संकट । पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे लिफ्टच्या बहाण्याने वाटेत अपहरण title=
संग्रहित छाया

जळगाव : कोरोनाचे संकट असल्याने आणि हाताला काम नसल्याने मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन मुलीचे अपहरण केल्याची गंभीर घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत अज्ञात तरुणाच्य विरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहे, अशी माहिती देण्यात आली.

मुंबईतील मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याकडे निघाले होते. पायी जात असलेल्या या कुटुंबाला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील १७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो, असे सांगितले. 

पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भाव काळजीत पडला. त्यानंतर याची माहिती त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.