KDMC ची फक्त दिखावा कारवाई, वाईन शॉपवर तुफान गर्दी

कल्याण-डोंबिवलीमध्ये पालिका प्रशासन दुर्लक्ष

Updated: Mar 29, 2021, 06:37 PM IST
KDMC ची फक्त दिखावा कारवाई, वाईन शॉपवर तुफान गर्दी title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना पालिका प्रशासन मात्र याकडे गांभिर्याने पाहात नसल्याचं दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम पालिका प्रशासनातील लोकांकडूनच होत असल्याचं चित्र आहे. 

आज होळीच्या दिवशी दुपारनंतर वाईन शॉपवर तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. येथे ना ना सोशल डिस्टन्सिंग होतं ना कोणाच्या तोंडावर मास्क. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना पालिकेने वाईन शॉपवर डोळेझाक केले होते.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा संकट काही कमी होत नाहीये. पालिका प्रशासन मात्र फेरिवाल्यांवर मेहरबान असल्याचं याआधी देखील दिसलं होतं. तक्रारी करुन देखील कारवाई होत नाही असं येथील लोकांचं म्हणणं आहे. पालिका अधिकारी नावाला येऊन कारवाई करतात त्यानंतर परिस्थिती जैसे थेच असं येथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

आठवडी बाजारांमध्ये मोठ्या प्रणामात गर्दी पाहायला मिळतेय. पालिका प्रशासन याकडे ही दुर्लक्ष करतंय. कल्याण-डोंबिवलीत रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास 1000 च्या घराजवळ पोहोचली आहे.

कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 941 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये उपचार घेत असलेले रुग्ण 8123 इतके आहेत. तर एका दिवसात 590 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.