कोरोना राक्षसाचा चिमुकल्यांनाही विळखा; काय काळजी घ्याल वाचा

कोरोनाच्या दुस-या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसू लागलाय

Updated: Mar 29, 2021, 03:05 PM IST
कोरोना राक्षसाचा चिमुकल्यांनाही विळखा; काय काळजी घ्याल वाचा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांत देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होती आहे. लसीकरणानंतर सुरूवातीचे काही दिवस कोरोना आटोक्यात येतोय असे वाटत असतानाच कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. त्यात आता कोरोनाच्या दुस-या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसू लागलाय. बंगळुरूत दहा वर्षांखालील मुले जास्त प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचे चित्र आहे. या वयोगटातल्या रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

या महिन्यात बंगळुरूत दहा वर्षांखालील 472 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यातील 244 मुले आहेत तर 228 मुली आहेत. येत्या दोन दिवसांत हा आकडा 500पार जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र यंदा हेच प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. 

काय काळजी घ्याल 

  • लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.
  • त्यांना मास्क, सॅनिटायझर तसच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं महत्व समजावून सांगा.
  • बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यास सांगा.
  • मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणं टाळा.
  • सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

कोरोना आता तुमच्या चिमुकल्यांपर्यंत येऊन पोहचलाय. त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

संसर्ग होण्यापूर्वी खबरदारीचा उपाय हा कधीही चांगलाच...