Pune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण

Pune Bypoll Election Result 2023: कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट मुक्त निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली आहे.

Updated: Mar 2, 2023, 06:58 AM IST
Pune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण title=
Devendra Fadnavis

Pune Kasba Bypoll Election Result 2023: संपूर्ण राज्याचं लक्ष उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या कसबा (Kasba Bypoll) आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll) निकालाकडे असतानाच कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आचारसंहितेचे भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भातील पत्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलं आहे. 

23 तारखेच्या सभेतील विधानावरुन तक्रार

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे कसब्यामधील उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी एक जाहीर सभा घेतली होती. या वेळी दिलेल्या भाषणामध्ये फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख केल्याकडे धंगेकर यांनी निवडणूक आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे. हिंदुत्वाचा उल्लेख करत फडणवीस यांनी मतदारांना भडकवल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. 

समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न

निवडणुकीच्या प्रचारामध्ये धर्माचा वापर करुन फडणवीस यांनी समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केल्याचं धंगेकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अशाप्रकारे धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करुन फडणवीस यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

कसब्यामध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी

कसबा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झालं. तसेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी रोजी निधन झाल्याने या दोन्ही मतदरासंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. एखाद्या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर सामान्यपणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून देण्याची अलिखित परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या परंपरेला बगल देत निवडणुका लढवण्यात आल्या आहेत. कसबा आणि चिंचवडमध्येही अशाच पद्धतीने निवडणुका लढवण्यात आल्या आहेत. कसब्यात हेमंत रासने (Hemant Rasne) विरुद्ध रवींद्र धंगेकर (Raindra Dangekar) अशी थेट लढत आहे. 

चिंचवडमध्ये तिहेरी लढत

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये तिहेरी लढत पहायला मिळत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashiwini Jagtap) यांना भाजपाने उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देत निवडणूक लढवली. मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडोखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने रंगत अजून वाढली आहे. चिंचवडमध्ये सरासरी 45 टक्के मतदान झालं असून ही मत कोणत्याच्या बाजूने पडली हे उद्याच स्पष्ट होणार आहे.