रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदधर्म वाचेल असे विधान कर्णीसेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी केले आहे. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज विजयादशमी दिवशी सांगता झाली.
या समारोप दौडीत हजारो धारकरी धावले. यावेळी बोलताना कर्णी सेनेचे सिंगर म्हणाले, सद्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत, संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्म गुरू आहेत. संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदधर्म वाचेल असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. दौडीच्या सांगता समारंभास खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, कर्णीसेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी उपस्थिती लावली होती.
नवरात्रीच्या काळात दररोज पहाटे श्री शिवप्रतिष्ठानची दौड निघते. या दौडीला ३६ वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षीही ३० सप्टेंबर पासून सांगलीसह संपूर्ण राज्यात श्री दुर्गामाता दौड सुरू होती. आज दसऱ्याच्या दिवशी या दौडीचा समारोप करण्यात आला. 'जयभवानी-जयशिवाजी'च्या जोरदार जयघोषाने धारकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
डोक्याला फेटा अथवा गांधीटोपी घालून दौडीत शिवभक्त सहभागी झाले होते. दौडीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. देशप्रेमाच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी खासदार धैर्यशील माने आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजपूजन करण्यात आले.
त्यानंतर मारुती चौकातून दौडीला प्रारंभ झाला. राजवाडा चौक, वखारभाग, कॉलेज कॉर्नरमार्गे निघालेली दौड दुर्गामाता मंदिराजवळ पोचली. त्याठिकाणी प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र झाल्यानंतर दौड मीरा हौसिंग सोसायटी, संभाजी कॉलनी, टिम्बर एरिया, कॉलेज कॉर्नर, आमराई, वखारभागमधून निघालेली दौड शिवतिर्थाजवळ विसर्जित झाली.