Olx वरुन गाड्या विकत घेताय..? मग थांबा तुमची गाडी असू शकते चोरीची

Olx वर चोरीची गाडी विकणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

Updated: Jul 20, 2022, 09:55 PM IST
Olx वरुन गाड्या विकत घेताय..? मग थांबा तुमची गाडी असू शकते चोरीची title=

Stolen Cars Selling On Olx : गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली परिसरात बाईक, रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच, पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ओएलएक्सवर (OLX) बाईक, रिक्षाची विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी बाईट, रिक्षा अशी ११ वाहने जप्त केली आहेत.

कल्याण (Kalyan) येथील महात्मा फुले पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख व जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावे असून दोघे सख्खे भाऊ आहेत. हे दोघेही ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्सवरुन (Stolen Cars Selling On Olx)  लोकांची फसवणूक करत होते.

पोलिसांना एक व्यक्ती चोरीची बुलेट मोटरसायकल विकण्यासाठी कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी मोहम्मदअकबर शेखला शिताफीने अटक केली. ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे सांगत त्याची ओएलएक्सवर बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीसाठी नोंद करणार असल्याची माहिती मोहम्मदने पोलिसांना दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेखलादेखील पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गुन्ह्यांची उकल केली आहे.

कसे करायचे फसवणूक?
आरोपी ओएलएक्सवर अपलोड केलेल्या दुचाकीसारखीच दुचाकी चोरी करायचे. त्यानंतर ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत संबंधित मालकाकडून गाडीची कागदपत्रे मागून घेत असत. या कागदपत्रावरुन चोरीच्या गाडीची कागदपत्रे तयार करण्यात येत असे. त्यानंतर चोरीच्या गाडीची ओएलएक्सवर विक्री करत होते.
दरम्यान, या दोघाविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या १४ गुन्ह्यांचीही उकल करत ११ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये दोन बुलेट, सहा दुचाक्या आणि एका रिक्षाचा समावेश आहे. आरोपींनी अशाप्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात असा पोलिसांना संशय  आहे .