अनलॉकच्या पहिल्याच दिवशी 'या' भागात एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी

मुंबई- ठाण्याला जाण्यासाठी प्रवासी तब्बल चार तास प्रतिक्षेत...  

Updated: Jul 20, 2020, 12:08 PM IST
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी 'या' भागात एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी  title=
संग्रहित छायाचित्र

कल्याण : coronavirus कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंथ्या पाहता त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ल़ॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊन रविवारी संपल्यामुळं सोमवारपासून या भागात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. 

अनलॉक सुरु झाल्यामुळं या भागात मोठ्या संख्येनं नागरिक कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असून अद्यापही लोकल प्रवास मर्यादित असल्यामुळं सर्वांनी एसटीकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिणामी कल्याण एसटी आगारात सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं कल्याण डोंबिवलीत पुन्हा 17 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. जो रविवारी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात आला. आता या भागांमध्ये फक्त केवळ कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातच लॉकडाऊन असल्यामुळं उर्वरित परिसरातील लोकं कामावर जाण्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले पाहायला मिळाले. 

 

लोकल प्रवासासाठी केवळ शासकीय कर्मचाऱ्यांनाच परवानगी असल्यामुळं सर्व खासगी कार्यालयातील कर्मचारी ठाणे- मुंबईला जाण्यासाठी लालपरीवर अवलंबून आहेत. त्यामुळं साडेसहा वाजल्यापासून कल्याण एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई आणि ठाण्याला जाण्यासाठी शेकडो प्रवासी तब्बल चार तास लालपरीच्या प्रतिक्षेत असलेलं दिसून आले. त्यामुळं लॉकडाऊन ओपन होऊनही प्रवासासाठी पुन्हा आधीच्याच त्रासाला या कर्मचाऱ्यांना सामोरे जावं लागल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. याबाबत एसटी प्रशासनाशी संपर्क साधला असता एसटीच्या अनेक चालक वाहकाना कोरोना झाल्यामुळं एसटीची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आलं आहे.