Corona Update: मुंबईत JN.1 चे रूग्ण वाढले; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद

Corona Update : राज्याची आकडेवारी पाहिली तर पुण्यामध्ये JN 1 च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. पुण्यामध्ये एकूण 150 रुग्ण आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 12, 2024, 07:04 AM IST
Corona Update: मुंबईत JN.1 चे रूग्ण वाढले; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद title=

Corona Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुख्य म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN 1 च्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. मुंबईमध्ये 22 तर ठाण्यात 7 रुग्णांना या नव्या सब व्हेरिएंटची लागण झाली आहे. सध्याच्या स्थितीत राज्यातील JN 1 च्या रुग्णांची संख्या 250 वर पोहोचली आहे.

पुण्यात JN 1 च्या रूग्णांची संख्या अधिक

राज्याची आकडेवारी पाहिली तर पुण्यामध्ये JN 1 च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. पुण्यामध्ये एकूण 150 रुग्ण आहेत. त्याच वेळी, कोविड 19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होतोय. गुरुवारी मुंबईत 29 आणि ठाण्यात 10 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. सर्व Omicron प्रकरणे XBB 1.16 या व्हेरिएंटने संक्रमित आहेत.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी राज्यात 13,687 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये 144 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या 169 लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे 849 एक्टिव्ह रुग्ण आहेत. यावेळी 45 कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी 24 रूग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यासोबतच रिकव्हरी रेट 98.17 टक्के आणि मृत्यू दर 1.81 टक्के आहे.

कोणत्या भागात किती कोरोनाचे रूग्ण?

राज्यात कोरोनाची आकडेवारी पाहिली तर मुंबई- 29, ठाणे- 10, नवी मुंबई- 20, कल्याण- डोंबिवली- 4, उल्हासनगर- 1, पालघर- 1 आणि पनवेलमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यातील आणि शहरातील रुग्णालयांमध्ये व्हायरसचा सामना करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलीये.

देशात 24 तासांत JN 1 च्या 827 रूग्णांची नोंद

कोरोनाचे नवा सब व्हेरिएंट JN 1 मुळे पुन्हा एकदा अडचणी वाढताना दिसून येतंय. अहवालानुसार, 11 जानेवारीपर्यंत 12 राज्यांमध्ये या व्हेरिएंटचे 827 संक्रमित लोक आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत, देशात कोविड सब व्हेरिएंट JN 1 च्या 21 प्रकरणे नोंदवली गेली. या संख्येत 6 जानेवारीपर्यंत 682 इतक्याने वाढ झालीये.