मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयदत्त क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण...

आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.

Updated: Dec 1, 2017, 08:25 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयदत्त क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण... title=

मुंबई : आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी क्षीरसागर यांच्यासोबत बीडपर्यंत विमानप्रवास केला. एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापानही केलं. त्यामुळं क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय. 

मात्र, मुख्यमंत्री केवळ चहापानासाठी आले होते. त्यांच्यासोबत कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं क्षीरसागरांनी स्पष्ट केलंय. मी पक्षावर नाराज आहे की नाही हा नंतरचा भाग... असं सांगतानाच योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मुख्यमंत्र्यांसोबत चहापान

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्षीरसागर यांच्या घरी पोहचले. त्यांच्या सोबत राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे याही होत्या. विशेष म्हणजे मुंबईहून मुख्यमंत्री आणि क्षीरसागर एकाच विमानाने औरंगाबादला आले. तिथून एकाच हेलिकॉप्टरने ते बीडला रवाना झाले. हेलिपॅडवर येताच क्षीरसागर यांच्या घराकडे सीएम यांचा ताफा रवाना झाला.

दरम्यान बीडसह संपूर्ण मराठवड्यामध्ये शेतकऱयांच्या आत्महत्या होत असताना मुख्यमंत्री राजकीय दौरे करीत आहेत. त्यांनी पक्षीय राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी प्रतिक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री - जयदत्त क्षीरसागर भेटीवर दिली आहे.