जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले, १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Updated: Sep 16, 2019, 10:53 AM IST
जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले, १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून १५ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी रात्री २ दरवाजे उघडण्यात आले होते, मात्र वरील भागातून पाण्याची आवक सुरु आहे आणि धरण शंभर टक्के भरल्याने जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात सुद्धा नाशिक भागात मुसळधार पाऊस झाल्याने जायकवाडीत मोठी आवक झाली होती. त्यावेळीही धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यानं औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणीचे काही भाग यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तर सिंचनासाठी सुद्धा आता धरणातून पाणी देता येणार आहे.

आशिया खंडातील सगळ्यात मोठं मातीचं धरण अशी जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात एकीकडे भीषण दुष्काळ आहे, पावसाळा उलटून चालला तरी पाऊस पडत नाही. त्यामुळे पिण्यासाठी तरी पाणी मिळेल का नाही? याची शाश्वती राहिली नव्हती, पण आता जायकवाडी धरण १०० टक्के भरलं आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसंच सिंचनाला पाणी मिळण्याची शक्यता आहे.