गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावचे सैनिक बाळू नरवाडे हे गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता आहेत.
नरवाडे एक महिन्यांच्या सुट्टीनंतर २० ऑगस्ट रोजी सायंकाळी संचखंड एक्स्प्रेसने लुधीयाना इथे ड्युटी ज्वाईन करणायसाठी निघाले होते. पण ते अद्यापपर्यंत मिल्ट्री कॅम्पवर पोहोचले नसल्यानं नरवाडे कुटुंबिय भयभीत झालेत.
गेल्या १४ वर्षांपासून ते मिल्ट्रीमध्ये आहेत. सध्या ते पंजाब मधील फिरोजपुर येथे घरबाल्स रायफल्स युनिट मध्ये हाऊस किपर म्हणून कर्तव्यावर आहेत. ते २२ जुलै २०१७ रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. २० ऑगस्ट रोजी ते त्यांच्या सासरवाडीतून नांदेडला संचखंड एक्सप्रेस पकडण्यासाठी त्यांच्या मेव्हण्याबरोबर गेले होते. त्यांच्या मेव्हण्याने त्यांना संचखंड एक्स्प्रेसमध्ये बसवून दिलं. पण ते २२ तारखेपर्यंत फिरोजपूर येथे पोहोचलेच नसल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्काच बसला.
सैनिकाच्या पत्नीने अन्न पाण्याचा त्याग केला असून या घटनेमुळे कुटुंबीय हतबल झाली आहेत. कुटुंबीय नातेवाईक आणि गावकरी नरवाडे त्यांचा सर्वत्र शोध घेत असून रेल्वे पोलिसांकडून त्यांना मदत होत नसल्याचा आरोप सैनीकाच्या पत्नीने केलाय.
देशाचं रक्षण करणारा हा सैनिक गेल्या २२ दिवसांपासून संचखंड एक्सप्रेसमधून अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. सैनिकाचे भाऊ गंगाधर नरवाडे यांच्या तक्रारीवरून वसमत पोलीस ठाण्यात बाळू नरवाडे हरवल्याची बाबतची तक्रार झीरोने दाखल करून हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्यावतीने ही याबाबतचा तपास सुरू आहे.
बाळू नरवाडे यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. तर सहा महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे मुले झाले आहेत. बाळू नरवाडे हे जालन्यापर्यंत सचखंड एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते. अस त्यांच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांना माहिती मिळाली आहे. पण त्यापुढे त्यांचा ठावठिकाणा मिळत नाहीय. त्यामुळे नरवाडे यांच्या पत्नी त्यांना लवकरात लवकर शोधून काढा, अशी केंद्र आणि राज्य सरकारकडे कळकळीची विनंती करू लागल्या आहेत. गेल्या २२ दिवसांपासून एक जवान गायब झालाय आणि तो सापडत नाही. ही बाब अत्यंत गंभीर अशीच म्हणावी लागेल.