नितेश महाजन, झी मीडिया
Jalna Crime News: पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी धाड टाकलेल्या 'थिंकींग कप' कॉफी शॉप मधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीवर प्रियकराकडूनच दोनदा बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
जालन्यातील एका 18 वर्षीय तरुणीवर दोन वेळा प्रियकराकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोहेल पठाण असं या घटनेतील आरोपी प्रियकराचं नाव आहे. या घटनेत प्रेयसी ही गर्भवती राहिल्यानं प्रियकरानं तिला परस्पर गर्भपाताच्या गोळ्या-औषधी दिल्याचंही समोर आले आहे. परस्पर औषध घेतल्याने तरुणीची प्रकृती खालावली आहे.
तरुणीची तब्येत बिघडल्याने प्रियकराने तिला एका खाजगी रुग्णालयात भरती केले व त्यानंतर प्रियकर फरार झाला आहे. तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर पीडित मुलीने घरच्यांना घडलेल्या हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी प्रियकर फरार झाला असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालना येथील एका कॉफी सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली होती. येथे कॉफी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. या सेक्स रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. त्याच कॉफी सेंटरमध्ये आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्याचबरोबर या कारवाईत पोलिसांनी जेव्हा कॉफी सेंटरमध्ये धाड टाकली तेव्हा पोलिसांनी 5 महाविद्यालयालयीन जोडप्यांना अश्लील चाळे करताना पकडले. पकडलेले पाचही जोडपे हे महाविद्यालयीन तरुण -तरुणी आहेत. या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याकडून एक तासाचे 500 रुपये घेत असल्याची माहीती उघडकिस आली आहे.