'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 4, 2023, 01:38 PM IST
'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला title=
राज ठाकरेंनीआंदोलकांसमोर केलेल्या छोट्या भाषणात अनेक मुद्दे मांडले

Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जालन्यामध्ये जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलकांना उद्देशून एक छोटं भाषण केलं. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारणी केवळ तुमचा वापर करुन घेतात असं सांगितलं. राज ठाकरेंनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेखही केला. तुमच्यावर काठ्या बरसवणाऱ्यांना मराठवाडा बंदी करा, इथं पाऊल ठेऊ देऊ नका त्यांना असा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी आंदोलकांना आपण तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं.

...तेव्हा हे काठीचे व्रण लक्षात ठेवा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी राज ठाकरेंनी 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. यानंतर त्यांनी आपल्या भाषणामध्ये मनोर जरांगे यांना आपण उपोषणाच्या माध्यमातून जीव धोक्यात टाकू नका असा सल्ला दिल्याचं सांगितलं. 'गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्यांच्यासाठी काय एकजण गेला काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. परत या लोकांच्या कधी नादी लागू नका,' असा सल्ला राज यांनी आंदोलकांना दिला. पुढे बोलताना राज ठाकरेंनी, 'आज काही निवडणुका नाही काही नाही. कशाचा काही पत्ता नाही. पण निवडणुका येतील तेव्हा हे असेच विषय तुमच्यासमोर आणतील तेव्हा हे काठीचे व्रण लक्षात ठेवा,' असं राज ठाकरेंनी सांगितलं.

...त्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ देऊ नका

सत्ताधारी नेहमी पुतळ्यांचं आणि आरक्षणांचं राजकारण करुन तुमच्याकडून मतं पदरात पाडून घेतात आणि नंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतात, असंही राज यावेळेस म्हणाले. ज्यांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, पोलिसांना तुमच्या गोळा चालवायला लावल्या. त्यांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत ते केलेल्या गोष्टीची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना इथं पाऊल ठेऊ देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी मराठा आरक्षण आंदोलकांना केलं.

नक्की वाचा >> 'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले

लाठी चार्जचं फुटेज पाहिलं अन्...

मी इथल्या लाठी चार्जचं फुटेज पाहिलं असंही राज ठाकरेंनी आंदोलकांना सांगितलं. 'ज्यापद्धतीने माझ्या माता-भगिनींवर लाढ्या बसरत होत्या ते मला बघवलं नाही. आता यांनी (मनोज जरांगेंनी) मला काही विषय सांगितले आहेत. मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालेन. त्याचं काय होईल माहीत नाही. मला खोटं बोलता येत नाही. खोटी आश्वासनं देता येत नाहीत मी मुख्यमंत्र्यांशी, तज्ज्ञांशी बोलेन आणि विषय सोडण्यासारखा असेल तर नक्की सोडवू,' असं आश्वासन राज यांनी आंदोलकांना दिलं.