आरोपानंतर एकनाथ खडसे - गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन

एकनाथ आणि गिरीश महाजन वाद मिटल्यात जमा आहे. 

Updated: Jan 2, 2020, 11:46 PM IST
आरोपानंतर एकनाथ खडसे - गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन title=

जळगाव : भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. खुद्द ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही नाराजीची खदखद जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांवर आणि विरोधी पक्षनेत्यांकडे बोट दाखवले होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. भाजप जळगाव जिल्हा परिषद आपल्याकडे राखणार का, याची चर्चा होती. मात्र, एकनाथ आणि गिरीश महाजन वाद मिटल्यात जमा आहे. त्यांचे मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. कारण दोघांमध्ये संवाद होताना दिसून येत आहे.

भाजचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच माझे तिकीट कापण्यासाठी कारणीभूत आहेत, असे आरोप केला होता. मात्र जळगावात भाजप कार्यालयात नाशिक जिल्हा परिषदेच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात मनोमीलन झाल्याचे दिसून आले आहे. 

आमच्यात काही तक्रारी नसल्याचे या दोघांनीही बैठकीनंतर स्पष्ट केल्यामुळे नेमके काय शिजते, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उद्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी या दोघांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला विकोपाला गेलेला वाद सकृद्दर्शनी तरी मिटल्याचे दिसून येत आहे. 

या दोघांनी एकत्रितपणे बैठकीतून बाहेर पडत हसत-खेळत गप्पा मारल्या आणि जळगाव जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात असेल असा दावाही केला आहे. त्यामुळे खडसे यांची समजूत काढण्यात भाजपला यश आल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेच्या संपर्कात खडसे होते, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत संकेतही दिले होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्या परिषदेत चमत्कार होणार अशी चर्चा होती. मात्र, पुन्हा खडसे आणि महाजन एकत्र आल्याने भाजप जिल्हा परिषदेतील सत्ता आपल्याकडेच राखेल असा अंदाज आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या सदस्यांना व्हिप बजावला असून उद्या सकाळी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. तसे संकेत या बैठकीनंतर देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना कोणतीही संधी मिळू नये, म्हणून भाजपने सावध भूमिका घेतली आहे.