विनोद पाटील, झी मीडिया : जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. चोरांनी आता आपला मोर्चा थेट शेतशिवाराकडे वळवलाय. कधी रात्री अपरात्री तर कधी दिवसाढवळ्या शेतांमध्ये दरोडा घातला जातोय. तुम्हाला वाटलं असेल की ऐन रब्बीच्या हंगामात चोर पिकांची चोरी करत असतील. पण नाही...चोरांनी थेट शेतातल्या विहिरींवरील वीजपंपांवरच (Electric Pump) आपला हात साफ केलाय. वीजपंपासोबतच स्टार्टर, विजेच्या वायर्सचे बंडल्स चोरून नेत आहेत. एकाच शिवारात तब्बल 13 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत काहींनी पोलिसात (Police) तक्रारही दिलेली आहे.
तक्रारीनंतरही पोलिसांचा दुर्लक्ष
धक्कादायक म्हणजे पोलिसांनी याची गंभीर दाखल न घेतल्यामुळे वीजपंप चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरांची टोळी गावाच्या परिसरातीलच असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. मात्र पोलिसांना याचा कोणताही सुगावा कसा नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यामुळे चोरांची हिम्मत चांगलीच वाढलीय. तीन महिन्यांपूर्वी वीजपंप चोरीची पहिली घटना घडली होती. दहिवदमधील राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या शेतातून वीजपंप आणि स्टार्टर चोरीला गेले होते. त्यांनी यासंदर्भात रितसर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली. मात्र ढिम्म पोलीस प्रशासनानं यावर कोणतीही कारवाई केली नाही.
कारवाई सोडा मात्र घटनास्थळाची साधी पाहणीही केली नाही. त्यामुळे चोरांची भीड चेपली गेली आणि त्यांनी परिसरातील शेतांमध्ये चोऱ्यांचा सपाटाच सुरू केला. अवघ्या महिनाभरात आणखी 12 ठिकाणी वीजपंप, स्टार्टर, वीजेच्या वायर्सचे बंडल्सवर मोठ्या शिताफीनं आपले हात साफ केले. तरीही ढिम्म पोलिसांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे इतर पीडित शेतकरी हवालदिल झाले आणि त्यांनी साधी तक्रार नोंदवणंही टाळलं. परिणामी दहिवद शिवारातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. तर दुसरीकडे ऐन रब्बीच्या हंगामात वीजपंप आणि स्टार्टर पळवल्यामुळे पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न या पीडित शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. त्यामुळे पोलिसांनी आणखी होऊ घातलेल्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आतातरी पावलं उचलावीत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलीय.