Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा

वडिलांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारावीची परीक्षा देत उत्तम गुण मिळविले. वडिलांच्या हत्येनंतर ढासळलेली आर्थिक स्थिती व स्वतःला झालेला ब्रेन ट्युमर यामुळे शिक्षण बाधित होऊ न देता त्यांनी आपले वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले. 

Updated: Feb 5, 2023, 06:49 PM IST
Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : नक्षलवाद्यांनी ज्या परिसरात केली होती वडिलांची हत्या केली मुलगी आता तिथेच डॉक्टर बनून आदिवासी समाजाची सेवा करत आहे. डॉक्टर भारती मालू बोगामी (Doctor Bharti Malu Bogami) असे डॉक्टरचे नाव आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नक्षली संवेदनशील भामरागड तालुक्यातील हजारो आदिवासी रुग्ण डॉक्टर भारती मालू बोगामी यांच्या सेवेचा लाभ घेत आहेत (Inspirational journey).

नक्षलवाद्यांनी ज्या परिसरात पित्याची हत्या केली, त्याच परिसरात जिद्दीने डॉक्टरकीचे शिक्षण घेत आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉक्टर भारती मालू बोगामी आदिवासी समाजातील युवांसाठी आदर्श ठरल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात वास्तव्य असताना उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेचा निश्चय करणाऱ्या डॉक्टर भारती आदिवासी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातला आशेचा किरण ठरल्या आहेत.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातला भामरागड तालुका नक्षली हिंसेमुळे अतिसंवेदनशील क्षेत्र मानले जाते. याच क्षेत्रातील अतिदुर्गम मरकनार प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आरेवाडा रुग्णालयात डॉक्टर भारती मालू बोगामी कार्यरत आहेत. डॉक्टर भारती यांचे वडील मालू बोगामी लाहेरी गावचे सरपंच होते. 

गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य गोंड आदिवासी समुदायातील ते एक मोठं नाव होतं. नक्षलवाद्यांनी त्यांची 2002 साली नृशंस हत्या केली. याच सुमारास भारती बारावीची परीक्षा देत होत्या. मात्र, या घटनेनंतर निश्चय ढळू न देता वडिलांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारावीची परीक्षा देत उत्तम गुण मिळविले. वडिलांच्या हत्येनंतर ढासळलेली आर्थिक स्थिती व स्वतःला झालेला ब्रेन ट्युमर यामुळे शिक्षण बाधित होऊ न देता त्यांनी पुण्याच्या बीएसडीटी आयुर्वेद महाविद्यालयातून 2011 साली भारती यांनी बीएएमएस पदवी मिळविली. 

इंटर्नशिप नंतर डॉक्टर भारती तातडीने गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत आल्या. जिथे नक्षलवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. आपल्याला ज्या समाजाने घडवलं पुढे, आणलं त्याच समाजात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा निश्चय या भागात बदल घडवून गेला आहे.

माडिया आदिवासी समाजातील युवा आता उच्च शिक्षणाबाबत जागृत झाले आहेत. सध्या मरकनार प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर भारती आपले पती डॉ. सतीश तिरानकर यांच्यासह हजारो आदिवासी रुग्णांवर उपचार करत आहेत. ख्यातनाम समाजसेवी बाबा आमटे डॉक्टर भारती त्यांची प्रेरणा आहेत. ज्या भागात साधे रस्ते व मोबाईल नेटवर्क देखील नाही अशा क्षेत्रात डॉक्टर भारती आदिवासी रुग्णांची निरंतर सेवा करत आहेत. 

24 तास कार्यरत राहून आरोग्य शिबीर- विविध ऑपरेशन्स आदींचे आयोजन करत अतिदुर्गम क्षेत्रातील वैद्यकीय सेवा सुकर केली जात आहे. आदिवासी दुर्गम भागांमध्ये डॉक्टर्स येण्यास इच्छुक नाहीत. मात्र विविध रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आहे. अशा वेळेस नक्षल संवेदनशील जागी सेवेचा मूलमंत्र जपणाऱ्या डॉक्टर भारती यांचे समाजात अभिनंदन केले जात आहे.

डॉक्टर भारती यांच्या आदिवासी समाजाच्या सेवेच्या निश्चयात त्यांचे पती डॉक्टर सतीश तिरानकर यांनी मोठे योगदान दिले आहे. या दोघांची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी होती. बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले डॉक्टर सतीश यांना डॉक्टर भारती यांच्याशी संवादातून गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी समाजातील विविध समस्यांचा परिचय झाला होता. त्यामुळेच डॉक्टर सतीश यांनी देखील अतिदुर्गम मागास व नक्षली संवेदनशील भागात स्वेच्छेने स्वतःची पोस्टिंग करून घेतली. आदिवासी समाजासाठी उत्तम शैक्षणिक वातावरणाची निर्मिती व्हावी व इथला आदिवासी रुग्ण विनाउपचार राहू नये यासाठी हे दांपत्य लक्ष देत आहे

गडचिरोली जिल्हा मागील 5 दशकं नक्षली हिंसेने ग्रस्त आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजातील युवकांमध्ये शिक्षणाप्रती जागरूकतेचा अभाव आहे. हाच अभाव त्यांच्या प्रगतीत अडसर बनला आहे. अशा स्थितीत परिवर्तन घडविण्यासाठी डॉक्टर भारती यांनी आपल्या पतीसह भक्कम पाऊल उचलले आहे. त्याचा फायदा देखील आदिवासी समाजातील दृष्टिकोन बदलण्यात झाला आहे. आदिवासी युवकांना वेगळ्या वाटेवरून मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे या दोघांचे प्रयत्न या भागातील प्रगतीचा आशेचा नवा किरण ठरले आहे.