CM Eknath Shinde Independence Day Speech: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मंत्रालयामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केलं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी 12.5 हजार कोटींची मदत केल्याचं सांगितलं. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळत असल्याचा उल्लेख केला.
"राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आनंद होतोय. आपण सर्वांनीच गरजूंच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. पंतप्रधान यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम घेऊन आपल्याला जबाबदारीच आठवण करून दिली आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच त्यांनी, "आधी सरकारकडून एक रुपया जाहीर झाला तर पंधरा पैसे हातात पडायचे. मात्र आता असं होतं नाही. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही विकासाची गंगा यावी यासाठी काम करत आलो आहोत," असं आपल्या भाषणात म्हटलं.
"केंद्र आणि राज्याचा समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळत आहे," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सहकारी पक्षाच्या दोन्ही प्रमुख नेत्यांचा उल्लेख केला. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी, "शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना आम्ही सुरु केली आहे. 12.5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजासाठी केलेली आहे. राज्य व केंद्र यांमधील समन्वयाचा नवा अध्याय आपण लिहित आहोत," असं भाषणात नमूद केलं. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या शसकीय निवासस्थानीही झेंडावंदन केलं.
भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. याप्रसंगी राष्ट्रध्वजाला वंदन करून सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.#स्वातंत्र्य_दिन #भारतीय_स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay #India #जय_हिंद #JayHind pic.twitter.com/stshDBQfCj
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 15, 2023
राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून केलेल्या कामांचा पाढा एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवला. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना सूट दिली, राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि मोफत तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं. तसेच उद्योजक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला पसंती देत आहे. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
थेट काँग्रेसचा उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी टोला लगावला. "पूर्वी काही लोकांनी गरिबी हटाव नारा दिला पण दारिद्र्य रेषेखालील लोकांना बाहेर काढत पंतप्रधान मोदींनीच खरा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचाराची कीड पंतप्रधानांनी दूर केली आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "चांगला समाज घडवण्याची जबाबदारी आहे. गेले वर्षभर आपण हेच काम केले आहे. समाजहिताचे अनेक निर्णय सरकार घेत आहे" असं मुख्यमंत्री म्हणाले.
'शासन आपल्या दारी' क्रांतीकारी निर्णयात सव्वा कोटी लोकांना लाभ दिला आहे या योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांच्या मनातील आनंद समाधान देतो, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण झालं.