मुलीने बाबा बोलण्याआधीच बापाने संपवलं, एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरलं

बाबा इतका कसा निर्दयी झालास तू... माझी चूक तरी काय होती...

Updated: Mar 12, 2022, 02:09 PM IST
मुलीने बाबा बोलण्याआधीच बापाने संपवलं, एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरलं title=

वाशिम : चिमुकल्या पावलांचं आगमन झालं की संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. मुल बोबड्या बोलीत आई-बाबा हाक मारतं तेव्हा आई-वडिलांच्या आनंदाला पारावर उरत नाही. पण पोटच्या मुलीच्या तोंडातून बाबा बाहेर पडण्याआधीच एका निर्दयी बापाने तिचा जीव घेतला. ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी उघडकीस आली आहे वाशिममध्ये.

एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाडीवाकद इथं घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. सुरेश प्रभाकर घुगे (वय 27 वर्ष) असं या निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
रिसोड तालुक्यात सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत वाडी वाकद शेतशिवारातील कोठ्यावर राहतो. सुरेश आणइ कावेरी घुगेंना तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणं होत होती. सुरेशला दारूचं व्यसन आहे. काल रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झालं. 

या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे धावत घेत दिराला सर्व माहिती सांगितली. सुरेशची पत्नी आणि सुरेशचा भावाने घराकडे धाव घेतली. घरात आल्यावर त्यांना एक वर्षाची चिमुकली कुठे दिसली नाही. याबाबत त्यांनी सुरेशला विचारणा केली. त्याने सांगितलेली माहिती ऐकून सर्वच हादरले. 

सुरेशने आपल्या पोटच्या एक वर्षाच्या मुलीला रागाच्या भरात चक्क जिवंत पुरलं होतं. पत्नीबरोबरच्या भांडणाचा राग त्याने चिमुकलीवर काढला. सुरेशची पत्नी, त्याचा भाऊ आणि गावातील काही जणांनी तात्काळ शेतशिवारात जिथे मुलीला पुरलं तिथे धाव घेत माती उकरुन काढली. पण तोपर्यंत त्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 

याप्रकरणी रिसोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पिता सुरेश घुले याला अटक केली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.