खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट, 'झी 24 तास'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची.एक खत घेताना दुसरं बळजबरीनं बळीराजाच्या गळ्यात मारलं जातंय.    

Updated: May 25, 2022, 11:26 PM IST
खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट, 'झी 24 तास'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश  title=

परभणी :  बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची.एक खत घेताना दुसरं बळजबरीनं बळीराजाच्या गळ्यात मारलं जातंय. खतं आणि बियाणांची टंचाई असल्यानं ऐन खरिपाच्या तोंडावर लूटमारीला ऊत आलाय. झी २४ तासनं स्टिंग ऑपरेशन करून या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. (important news for farmers zee 24 tass sting operation fertilizer)  

आकाशात ढग जमा झाले की शेतक्यांना वेध लागतात ते खरीप हंगामाचे. मराठवाड्यात मशागतीची 80 टक्के कामं पूर्णही झालीयेत. अशा वेळी खतं आणि बियाणांची टंचाई भासू लागल्यामुळे बळीराजाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचं फावलं असून लिंकिंगमध्ये विक्री सुरू आहे. 

शेतकऱ्यांना एक पोतं डीएपी खत घ्यायचं असेल तर त्याबरोबर 475 रुपयांचं सल्फर गळ्यात मारलं जातंय. झी 24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये याचा पर्दाफाश झालाय. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे विक्रेते गेल्यावर्षीचं पोतं यंदाच्या चढ्या दरानं शेतकऱ्यांना विकतायत.

दरम्यान, लिंकिंगमध्ये खत घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती परभणीच्या कृषीविकास अधिकाऱ्यांनी दिलीये. खतांची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांची ही खुलेआम लूट सुरू आहे.

मराठवाड्यात गतवर्षीचं 3 लाख 50 हजार 38 मेट्रिक टन खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय.  कृषी विभागानं यंदाच्या हंगामासाठी 16 लाख 52 हजार 522 मेट्रिक टनांची मागणी नोंदवली आहे.

यापैकी 12 लाख 71 हजार 964 मेट्रिक टनांचं वाटप मंजूर झालंय. मात्र मे महिना संपत आला असताना अद्याप 3 लाख 68 हजार 875 मेट्रिक टन खत येणं बाकी आहे. बियाणांचीही अशीच स्थिती असून जुन्या, बोगस बियाणांची सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप शेतकरी करतायत. 

मराठवाड्यात कृषी विभागानं भरारी पथकं नेमली असतानाही शेतकऱ्यांची उघडउघड लूट सुरू आहे. सरकारनं या गैरप्रकारांची गंभीर दखल घेऊन बळीराजाला लुबाडणाऱ्यांना चांगली अद्दल घडवायला हवी, अशी मागणी शेतकरी करतायत.