अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात आता नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा नवा फंडा अवलंबला आहे. शहरातील महत्वाच्या चौकात पोलीस, साध्या वेशातील ट्रॅफिक क्रॅक टीम नियम तोडणाऱ्यांकडून दंड वसूल करत आहेत. एवढंच नव्हे तर संबंधिताचे घर गाठून पोलीस त्याच्या धोकादायक ड्रायव्हींगची कल्पना देणार आहेत. अशा वाहनचालकांना पकडण्यासाठी साध्या वेशातील वाहतूक क्रॅक टीम सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहुन सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. सिग्नल ब्रेक करुन पोलिसांना चुकवणाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना धोकादायक ड्रायविंगची कल्पना देण्यासाठी संबंधिताचे घर गाठत आहेत.. या कारवाईकरता प्रत्येक झोनमध्ये वाहतूक क्रॅक टीम राहणार असल्याचं डीसीपी गजानन राजमाने यांनी सांगितलं.
या कारवाई अंतर्गतच बुधवारी सकाळीच सिग्नल ब्रेक करणाऱ्या पंढरीनाथ बेंदेवार यांच्या बेसा परिसरातील घरीही वाहतूक पोलिसांची गाडी पोहोचली. त्यांनी बेंदेवार यांना पुराव्यासकट त्यांचे चुकीचे कृत्य लक्षात आणून दिले. आता थेट पोलिसच पुरावा घेऊन घरी आल्यानंतर पंढरीनाथ यांनीही त्यांची चूक मुकाट्याने मान्य केली.
नागपूर पोलिसांनी ट्रॅफिक क्रॅक टीमची संकल्पना राबवून सिग्नल ब्रेक करणाऱ्यांना किमान दोनशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दंड लावणे सुरु केले आहे. वाहन चालकांचे सिग्नल जम्पिंगचे प्रमाणे शून्य करण्यासाठी वाहतूक विभागाकडून ही मोहीम राबवत आहे.