औरंगाबाद : वामन हरी पेठे औरंगाबाद शाखेत मॅनेजरने ५८ किलो सोने चोरले. शहरातील समर्थ नगर शाखेत ही घटना घडली. अंकुर राणे असे आरोपी मॅनेजरचे नाव आहे. तसेच सहआरोपी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या मदतीने हे सोने चोरल्याचे पुढे आले आहे. या चोरीप्रकरणी औरंगाबाद क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
२७ कोटी रुपयांचे तब्बल ५८ किलो सोने चोरीला गेल्याने वामन हरी पेठे ज्वेलर्स मालकाला मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी दुकान मालकाने दुकानातील सोने साठा तपासला असता दुकानातील प्रत्यक्ष सोने आणि कागदपत्रांवर असलेले सोनं यात ५८ किलोचा फरक आढळला होता. मालकाने मँनेजरला विचारले असता हा माल एका ग्राहकाला पाहण्यासाठी दिलाय तो परत येईल, असे सांगितले.
मात्र सहा महिने झाल्यावरही माल परत न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यासाठी मालक गेल्यावर मॅनेजर अंकुर राणे याने गुन्हा कबूल केला. दुकानातील सोने राजेंद्र जैन आणि लोकेश जैन यांना विकण्यासाठी दिले असल्याची कबूली दिली. त्यातून २५ टक्के रक्कम मला मिळणार असेही त्याने सांगितले. ही चोरी लपवण्यासाठी मॅनेजरने सोन्याचे बिल दुकानातच ठेवून फक्त माल बाहेर दिला होता, असेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अंकूर राणेसह दोन जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.