...तसं सर मला पायदळी तुडवतात; प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून पोट धरुन हसाल

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील एका शाळेत भाषण देताना या विद्यार्थ्याने लोकशाहीचा सांगितलेला फायदा ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Updated: Jan 28, 2023, 12:43 PM IST
...तसं सर मला पायदळी तुडवतात; प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून पोट धरुन हसाल title=

Republic Day 2023 : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत (Delhi) कर्तव्यापथावर पथसंचलन करण्यात आले. तर देशभरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. अनेक सरकारी कार्यालये, महाविद्यालये, शाळांमध्येही उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याता आलाय. यावेळी शाळांमध्ये मुलांनी विविध विषयांवर भाषणेसुद्धा केली. महाराष्ट्राती (Republic Day Maharashtra) अशाच एका शाळकरी विद्यार्थ्याने संविधानाचे महत्त्व सांगणारे केलेले भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका गावात ध्वज फडकवण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी एका विद्यार्थ्याने केलेल्या भाषणाने शिक्षकांसह सर्वांनाच हसू अनावर झाले. या विद्यार्थ्याने भाषण करताना लोकशाहीचा आपल्याला कसा फायदा झालाय हे सांगितलं. भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्याचे जोरदार कौतुक केले. 

काय म्हटलंय या चिमुकल्याने आपल्या भाषणात?

"खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसे सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही," असे या चिमुकल्याने आपल्या भाषणात म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कोणत्या शाळेतील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.