नागपूर : 'मेरीटमध्ये जे येतात ते मोठे अधिकारी बनतात, मात्र सर्वात शेवटचा क्रमांक मिळवणारे राजकारणी बनतात. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनात मेरीटमध्ये आलंच पाहिजे, असा काही नियम नाही' असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. रविवारी नागपूरमध्ये 'कलावंतांच्या मनातील मान्यवर' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉक्टर मनोज सालपेकर यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. यावेळी गडकरींनी त्यांच्या खास शैलीत प्रश्नांची उत्तरं दिली.
प्रामाणिकपणा तसं पारदर्शकता यांसारखे मूल्य लांबच्या पल्ल्यात उपयोगी ठरतं. हाच राजकारण सामाजिक - आर्थिक सुधारणांचा पाया आहे. राजकारण हे प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे, इथं लोकांच्या आकांक्षांप्रमाणे काम करावं लागतं, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.
राजकारणात कोणकोणते गुण गरजेचे असतात? या प्रश्नावर उत्तर देताना 'मी कधीही राजकारण करिअर म्हणून पाहिलं नाही. माझ्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच राजकारण हे सामाजिक - आर्थिक सुधारणांचा मार्ग मानत आलोय. याद्वारे मी देश, समाज आणि गरिबांसाठी काम करू शकतो. राजकारणात कोणत्याही गुणांची आवश्यकता नाही' असं मत गडकरींनी व्यक्त केलं.
राजकारण करावं पण तेही प्रामाणिकपणे असंही गडकरींनी म्हटलंय. मी खोटी आश्वासनं देत नाही आणि जेव्हा मी बोलतो तेव्हा ते मी करतोच... जर मी एखादं काम करू शकत नसेल तर तसं स्पष्ट सांगून टाकतो, की करू शकणार नाही. प्रामाणिकपणा, पारदर्शकता, धैर्य, गुण आणि कामाप्रति समर्पण भाव यांसारखे मूल्य दीर्घकाळासाठी कामाला येतात, असं राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या गडकरींनी म्हटलंय.
दरम्यान या कार्यक्रमात अकरा वर्षांच्या साची अरमरकरनं या विद्यार्थिनीनं गडकरींचं व्यंगचित्र रेखाटलंय. आतापर्यंत केवळ संत्री नागपूरची ओळख होती. मात्र, आता मेट्रो ही नागपूरची नवी ओळख बनलीय. त्यामुळं हे चित्र रेखाटल्याचं तिनं सांगितलंय.