ठाणे : यंदाची होळी आणि रंगपंचमी साजरी करताना ठाण्यात इमारतीच्या गच्चीवरून फुगे आणि पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्याना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी इमारतींच्या गच्चीचे दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, अशा स्वरूपाचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्याअंतर्गत कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलिसांची चौफेर नजर सगळीकडे असणार आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे महिलांची छेडछाड रोखण्याकरिता साध्या वेषातील विशेष पथक गस्तीवर असणार आहे. होळी, रंगपंचमीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. यात सार्वजनिक ठिकाणातील झाडे व लाकडे तोडण्यास, जाळण्यास, दहन करण्यास मनाई, करण्यात आली आहे, याच जोडीला रंगीत पाणी, रंग पादचाऱ्यांवर फेकणे अथवा उडविण्याचा प्रयत्न करणे, आरोग्यास अपायकारक होईल, असे रासायनिक रंगाचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे, रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे इतर द्रव पदार्थाचे फुगे बनविणे अथवा प्लास्टिकच्या पिशव्या पाण्याने भरून फेकून मारल्यास ठाणे पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
आरोग्यास आणि जीवास धोका निर्माण होईल, सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, हावभाव, घोषणा देणे आदीबाबतही कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी अश्लील गाणी गाणे, वाकुल्या आणि विडंबनचे प्रदर्शन करणे भरविणे. एखादयाची प्रतिष्ठा, योग्यता आणि नैतिकतेला धक्का पोहोचेल, असे प्रकार करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे होळीच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे विशेष गस्ती पथक रस्त्यावर फिरणार आहेत. यात महिलांच्या छेडछाडीला आळा बसावा याकरिता सध्या वेशातील महिला आणि पोलिसांचे पथक विशेष लक्ष ठेवून असणार आहे.
त्याचप्रमणे होळी आणि धुळवडच्या दिवशी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सर्व इमारतींचे दरवाजे बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत या काळात इमारतींच्या गच्चीवरून रंग आणि पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या लोकांवर फेकण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली तसेच याबाबत प्रत्येक सोसायट्याना आवाहन करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या फेकणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. त्याचप्रमणे याकाळात दारू पिऊन वाहन चालवून अपघात होण्याची शक्यता अधिक असते त्याला आळा बसावा याकरिता ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई ही ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ही पथके एकाच ठिकणी न थांबता विविध ठिकाणी फिरत राहून ही कारवाई करणार आहेत.